मलकापूरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिलांची भव्य मोटरसायकल रॅली; उत्साहाचा जल्लोष

मलकापूर :- हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने मलकापूर शहरातून महिलांची भव्य मोटरसायकल रॅली उत्साहात पार पडली. सांस्कृतिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शहरात नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष साजरा केला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्ष स्वागतासाठी महिला रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यावर्षी रॅलीने अधिक भव्य स्वरूप धारण केले. सकाळी गुढीपूजन व ध्वजपूजन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. पारंपरिक पोशाखात सहभागी झालेल्या महिला व मुलींनी शहरातील विविध मार्गांवरून रॅली काढत संस्कृतीचे दर्शन घडवले.
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगरसंघचालक दामोदरजी लखानी, सहसंघचालक राजेशजी महाजन तसेच मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुखजी संचेती उपस्थित होते. त्यांनी रॅलीला शुभेच्छा देत महिला सहभागाचे कौतुक केले. रॅलीनंतर भव्य बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यात ५१ पैठण्यांचा लकी ड्रॉ काढण्यात आला, तर ११ महिलांना उत्कृष्ट पारंपरिक वेशभूषेबद्दल सन्मानित करण्यात आले. सजावट करून सहभागी झालेल्या लहान मुलींनाही बक्षिसे व पैठणी देण्यात आली. या कार्यक्रमासाठी विश्वकर्मा अ‍ॅग्रो इंजिनिअरिंग वर्क्सचे संचालक सचिन चव्हाण, डॉ. पुनम बाहेती, आकाश दोशी, डॉ. दोशी मॅडम तसेच रील्स स्टार तन्वी ताई, ओगले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने कार्यक्रम शांततेत व यशस्वीरीत्या पार पडला. श्रीराम बहुउद्देशीय संस्था आणि श्रीराम ढोल पथकाच्या सदस्यांनी संपूर्ण आयोजनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली.
या भव्य रॅलीमुळे मलकापूरातील महिला वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महिलांना सार्वजनिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी असे व्यासपीठ मिळणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करत नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले. भविष्यातही यापेक्षा अधिक भव्य आयोजन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment