अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला; वादळी वाऱ्यासह पावसामुळे मका, गहू भुईसपाट, नुकसानीचा सर्व्हे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

 नांदुरा :- तालुक्यात १९ मार्च रोजी रात्री नऊ ते दहा वाजेदरम्यान वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. धानोरा, विटाळी, काटी, बुर्टी, वडनेर शेंबा, टाकरखेड, डोलखेड, कंडारी, खैरा, वाडी, महाळुंगी परिसरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मका, गहू, कांदा बियाणे, ज्वारी, हरभरा तसेच केळी व पपईसारख्या फळपिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
वादळी वाऱ्याचा जोर इतका होता की अनेक शेतकऱ्यांची उभी पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली. काही ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडल्याने गाव जोड रस्त्यांवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. तसेच विजेच्या तारा तुटल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्रभर वीजपुरवठा खंडित झाल्याचे चित्र दिसून आले. सुमारे एक ते दीड तास चाललेल्या या वादळी पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या रब्बी पिकांना मोठा फटका बसला. विशेषतः मका, गहू, कांदा बियाणे, ज्वारी, हरभरा यांसह केळी व पपईसारख्या फळपिकांचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली हरभऱ्याची पिकेही वादळी पावसामुळे भिजून नुकसानग्रस्त झाली. यावर्षी आधीच अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे रब्बी हंगामातून नुकसान भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र ऐन कापणीच्या तोंडावर आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

“अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. माझे जवळपास आठ एकरांवरील मका पीक जमीनदोस्त झाले आहे. शासनाने तात्काळ सर्वे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी.”
— गौतमराव पाटील, शेतकरी, धानोरा

प्रशासनाने पाहणी सुरू

तहसील व कृषी विभागाच्या पथकाने नुकसानग्रस्त भागात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. महसूल विभागाकडून तालुक्यातील पिक नुकसानीचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असून लवकरच संयुक्त पथक प्रत्येक शेताची पाहणी करून नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार करणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Leave a Comment