सावत्र आईकडून बालिकेला मारहाण; 15 वर्षीय बालिकेची सुटका, मलकापूर तालुक्यातील घटना!

मलकापूर :- तालुक्यातील वरखेड येथे सावत्र आईकडून होत असलेल्या मारहाणीच्या प्रकारातून 15 वर्षीय बालिकेची चाइल्ड हेल्पलाइन 1098, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व मलकापूर ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून सुटका करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, 22 मार्च रोजी चाइल्ड हेल्पलाइनला संबंधित घटनेची माहिती प्राप्त होताच प्रकल्प समन्वयक शेख सोहेप यांनी तत्काळ दखल घेतली. त्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे तसेच बाल कल्याण समिती यांना माहिती देत पुढील कारवाई सुरू केली. यानंतर पथकाने वरखेड येथे जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली असता, संबंधित बालिकेला तिच्या सावत्र आईकडून मारहाण होत असल्याचे उघड झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन बालिकेला तिच्या मोठ्या भावासह ताब्यात घेऊन मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सावत्र आईविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे बालिकेला दिलासा मिळाला असून, बाल संरक्षण यंत्रणेच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.

Leave a Comment